LOKSANDESH NEWS
अनैतिक संबंध असल्याने पतीची पत्नीने आणि प्रियकराने केली हत्या
आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या महिलेचा डाव अखेर उघडकीस आला. राजगड पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली. मृत सिद्धेश्वर भिसे (३५, ससाणेनगर, पुणे, मूळ रा. धाराशिव) याचा त्याची पत्नी योगिता भिसे (३०) आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार (३२, तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी गळा दाबून खून केला आणि मृतदेह पोत्यात भरून सारोळा येथील नीरा नदीत फेकला.
रविवारी (दि. ९) सकाळी सारोळा येथील नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृताच्या हातावर 'ओम' गोंदलेले असल्याने त्याच्या ओळखीचा शोध सुरू झाला. चौकशीत ससाणेनगर परिसरात अशा वर्णनाचा एक व्यक्ती हरवल्याचे समजले.
राजगड पोलिसांनी सिद्धेश्वरच्या पत्नी योगिता हिची चौकशी सुरू केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांचा तपास अधिक खोलात गेल्यानंतर तिने अखेर खून केल्याची कबुली दिली.
योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी यांनी ३ मार्चच्या मध्यरात्री सिद्धेश्वरचा गळा दाबून खून केला.
मृतदेह लपवण्यासाठी तो पोत्यात भरून स्कूटरवरून सारोळा हद्दीत नेला आणि नीरा नदीत फेकला. राजगड पोलिसांनी जलद तपास करत अवघ्या १२ तासांत आरोपींना अटक केली.