जवळ्यात भरकटलेल्या बछड्याची आईशी भेट, कॅमेऱ्यात कैद झालेला हृदयस्पर्शी क्षण
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जवळा बाजार शिवारातील एका शेतात अंदाजे दीड महिन्याचा बिबट्याचा बछडा आढळून आला होता. वनविभागाच्या प्रयत्नांमुळे त्याची आईशी पुनर्भेट घडवण्यात आली आहे. हा हृदयस्पर्शी क्षण वनविभागाने कॅमेऱ्यात कैद केला.ज्यानंतर मादी बिबट आणि बछडा पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेले.
जवळा बाजार येथील शेतकरी सुनील उखर्डा ढोकने यांच्या शेतात बिबट्याचा बछडा आढळून आला होता. सतर्कता म्हणून सुनील ढोकने यांनी ही माहिती वनविभागाला दिली.त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी बछड्याला ताब्यात घेऊन वन विभागाच्या कार्यालयात हलवले.मात्र, मादी बिबट दिसून न आल्याने बछड्याला तात्पुरते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले
. मादी बिबट बछड्याला शोधण्यासाठी त्या ठिकाणी परत येण्याची शक्यता गृहित धरून संध्याकाळी पाच वाजता बछड्याला पुन्हा त्या ठिकाणी आणण्यात आले. त्याला एका कॅरेटमध्ये ठेऊन परिसरात तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले..
सकाळी सहा वाजता कॅमेऱ्यात मादी बिबट्याने बछड्याला घेऊन जात असल्याचे दृश्य कैद झाले. अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी दिली आहे.