LOKSANDESH NEWS
कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड गावात पाणीटंचाई, पाण्यासाठी महिलांची वणवण
कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड गावातील महिलांना पाण्यासाठी रात्री 3 वाजता रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. केवळ एक तास येणारे पाणी अपुरे पडत असल्याने दिवसभर महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. झोपेच्या अभावामुळे महिलांचे आरोग्य बिघडत असून, थकवा आणि इतर शारीरिक त्रास जाणवत आहेत. महानगरपालिकेच्या दुर्लक्षाविरोधात संतप्त महिलांनी गावाच्या वेशीवर आंदोलन केले असून, लवकर तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील धाकटे शहाड गावात गेल्या वर्षभरापासून तीव्र पाणीटंचाई सुरू आहे. या गावात 3,000 हून अधिक रहिवासी राहतात, ज्यात नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, रात्री 3 ते 4 या दरम्यान केवळ एक तास येणारे पाणी अपुरे पडत असल्याने, महिलांना संपूर्ण रात्र जागून पाणी भरावे लागत आहे. यामुळे अनेक महिला थकवा, झोपेच्या अभावामुळे होणारे आजार, डोकेदुखी आणि इतर आरोग्य समस्यांना सामोरे जात आहेत. काही महिला डोक्यावर हंडे, कडेवर घागरी घेऊन पाण्यासाठी वणवण करताना दिसत आहेत.
गेल्या वर्षभरात नागरिकांनी महानगरपालिकेकडे अनेक वेळा तक्रारी केल्या, मोर्चे काढले, मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.
अखेर संतप्त गावकऱ्यांनी गावच्या वेशीवर शांततेत निषेध करत पालिकेच्या विरोधात आंदोलन केले. त्यांनी जर लवकरच पाणीटंचाईचा प्रश्न सुटला नाही, तर मोठ्या प्रमाणावर उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली