ठाणे-बोरीवली टनेल प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, आमच्या सोसायटीचा अॅप्रोच रस्ता हा पूर्वी प्रमाणे युनी अॅबेक्स कंपनीपर्यंत ठेवण्यात यावा, टोल नाका पुढे हलविण्यात यावा आणि वृक्षांची कत्तल थांबवावी अशा प्रमुख मागण्या शनिवारी एमएमआरडीएच्या वतीने लावण्यात आलेल्या बैठकीत रहिवाशांनी लावून धरल्या. त्यानुसार आता प्रत्येक सोसायटीमधील सदस्य एकत्र येऊन एक कमिटी तयार करण्यात यावी, त्या कमिटीच्या माध्यमातून एमएमआरडीएच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत म्हणणे पोहचवा अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी या बैठकीत दिली. तसेच रहिवाशांनी केलेल्या मागणीनुसार त्यावर उपाय योजना करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी दिल्या.
ठाणे-बोरीवली टनेलचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू झाले आहे. हा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराखालून काढण्यात येणार असून, त्याचे एक टोक ठाण्यातील मानपाडा येथील मुल्लाबाग भागात निघणार आहे. याठिकाणी सुमारे १२ हजाराहून अधिक नागरिक राहत आहेत. परंतु, येथील रहिवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर शनिवारी स्थानिक रहिवासी, एमएमआरडीएचे अधिकारी, ठेकेदार आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थित एक बैठक घेण्यात आली. यावेळी एमएमआरडीएच्या वतीने या प्रकल्पाचे सादीरकरण करण्यात आले. त्यात येथील रहिवाशांच्या मागणीनुसार टनेलचे काम हे ९२ मीटर पुढे सरकविण्यात आल्याचा दावा यावेळी एमएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जांभळे यांनी दिली. तसेच येथे २५०० मीटर पर्यंत हरीत पट्टा नष्ट झाला असला तरी टनेलच्या वरील बाजूस दोन टप्यात ५३०० मीटर हरित पट्टा विकसित केला जाणार असल्याचे सांगितले. तर रहिवाशांनी त्यांच्या आवारात वृक्ष लागवड करण्यास सांगितल्यास त्याठिकाणी देखील वृक्ष लागवड केली जाणार असल्याची माहिती यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.
दरम्यान, या प्रकल्पाला आमचा विरोध नसून गृहसंकुलाच्या येथून जाणारा रस्ता हा अरुंद झाला असून त्यामुळे येथील अॅप्रोच रोड हा युनीअॅबेक्स पर्यंत करण्यात यावा अशी प्रमुख मागणी रहिवाशांनी केली. तसेच येथील टोल देखील हटविण्यात यावा असे सांगत, हा रस्ता येथे कसा जाऊ शकतो, त्याचा अभ्यास देखील आम्ही केला असल्याची माहिती आशुतोष शिरोळकर, डॉ. लतीका भानुषाली, मोदी आदींसह इतर रहिवाशांनी केली. तसेच जो पर्यंत याचा निर्णय होत नाही, तो पर्यंत येथील काम बंद ठेवण्यात यावे अशी मागणी देखील सतिश चिंचोळी यांनी केली.
या कामात रहिवाशांना धुळ आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. तसेच एमएमआरडीएचे अधिकारी ठेकेदाराचे काम करतात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रहिवाशांनी जी मागणी केली आहे, त्यानुसार अभ्यास करुन पुढील दिशा ठरविण्यात यावी असेही त्यांनी सांगितले. तसेच वारंवार एवढ्या रहिवाशांनी एकत्र येणे शक्य नसून त्यासाठी प्रत्येक सोसायटीमधील काही ठराविक सदस्यांनी एकत्र येऊन कमिटी स्थापन करावी आणि त्या माध्यमातून पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली