शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभर आंदोलन
शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
मागण्या न मान्य झाल्याने आंदोलनकर्त्या महिलांनी ‘जेलभरो’ आंदोलन छेडत स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जाऊन अटक करून घेतली. आंदोलक महिलांनी किमान वेतन 26 हजार रुपये द्यावेत, चपराशी पदावर नियुक्ती करावी, निवृत्ती वेळी 5 हजार रुपये पेन्शन द्यावी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी जीवन विमा योजना लागू करावी, अशा मागण्या मांडल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या या आंदोलनात शेकडो महिलांचा सहभाग होता. शासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.