LOKSANDESH NEWS
बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक येथील चार एकर डाळिंब बाग शॉर्टसर्किटमुळे जळून खाक
बदनापूर तालुक्यातील कंडारी बुद्रुक येथील चार एकर डाळिंब बाग शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाली आहे.ही बागच नव्हे तर, या आगीमध्ये शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. कंडारी बुद्रुक येथील फळबाग उत्पादक शेतकरी विष्णू रामकिसन फटाले यांची ४ एकर क्षेत्रावरील बाराशे झाडाची डाळिंब बाग ऐन बहरात आली होती.
त्याचे उत्पन्नही सुरू झाले होते. गेले तीन वर्ष पासून या बागेतून चांगला माल मिळत होता. मात्र यावर्षी पाणीटंचाई असल्याने त्यांनी डाळिंबाच्या झाडाखाली उसाचे पाचट अंथरूण आच्छादन केले होते. या आच्छादनामुळे पाण्याचे बाष्प होण्यापासून रोखले जाते, व पाण्याची कमतरता असतानाही बाग तग धरून राहते.
मात्र हेच आच्छादन वरदान ठरण्या ऐवजी त्यांना त्यांच्या बागेचा ऱ्हास होण्यास कारणीभूत ठरले आहे. या बागेच्या मधोमधुन विद्युत वाहिनी गेलेली आहेत. वारे सुटल्यामुळे या तारांचे घर्षण होऊन ठिणगी पडली आणि पाहता पाहता पूर्ण ४ एकर मधील डाळिंब बाग आगीच्या भक्षस्थानी आली.
ग्रामस्थांनी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, अग्निशमन विभागाचा बंब ही बोलवण्यात आले, मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. विष्णू फटाले यांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. चार एकर क्षेत्रावरील ठिबक सिंचनचा संच व बाग जळून खाक झाली आहे. दुष्काळी परिस्थितीशी झगडत असताना जीवाचा आटापिटा करून जोपासलेल्या डाळिंब बागेची अशी वाताहत झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून हळहळ व्यक्ति केली जात आहे. या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी फटाले यांच्या कुटुंबीयांनी केली आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली