राज्यातील एकूण सात जिल्ह्यांमध्ये चोऱ्या, फसवणूक, अपहरण, बलात्कार अशा विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला एक कुख्यात आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून मागील दहा महिन्यांपासून फरार झालेला हा आरोपी शहरात संशयितरित्या फिरतांना त्याला ताब्यात घेण्यात आले. शेगाव पोलिसांची हि मोठी कारवाई मानली जात आहे.
गणेश सखाराम बांगर वय ३६ रा. मालेगाव जिल्हा वाशिम ह. मु. खडकी अकोला असे या कुख्यात आरोपीचे नाव असून चोऱ्या, फसवणूक, अपहरण, पोस्को, बलात्कार, हल्ला करणे असे अनेक गुन्हे या आरोपीवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. वाशिम, यवतमाळ, परभणी, मुंबई, नाशिक, अकोला, रायगड या जिल्ह्यांमध्ये हा आरोपी गुन्हे करायचा. शेवटचा गुन्हा हा अकोला जिल्ह्यातील मंगरुळपीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका १७ वर्षीय मुलीचे १० महिन्यांपूर्वी अपहरण केले होते. तेव्हा पासून तो फरार होता.
काल बुधवारी शेगाव येथील मंदिर परिसरात फिरत असतांना पोलिसांच्या डीबी पथकाला संशय आल्याने त्याची विचारपूस केली असता त्याच्या बोलण्यावरून संशय बळावला. त्यानंतर ठाण्यात नेऊन सखोल चौकशी केली असता तो राज्यातील विविध पोलिसांना हवा असल्याचे व त्याच्या विरुद्ध एकूण १२ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, पोलिसांच्या तावडीतून सुटल्याने या प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी सुद्धा निलंबित झाल्याचे निदर्शनास आले. अपहरण झालेली मुलगी आणि या आरोपीला रात्री उशिरा दिग्रस पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची माहिती ठाणेदार नितीन पाटील यांनी बोलतांना दिली.