LOKSANDESH NEWS
आम्ही कामातून उत्तर देतो, लोकांच्या सेवेसाठी काम करतो - राजेश मोरे
काश्मीरमधील पहलगाम येथे २२ तारखेला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या भारतीय पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या मोठी होती. आता या सगळ्या परिस्थितीत ८७० पर्यटकांना सुखरूपपणे आणण्यात आले असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशासनाच्या मदतीने हे मोठं काम पार पडलं आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथे २२ तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांसह अनेक भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक पर्यटक तिथे अडकले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः काश्मीरला गेले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितलं की, आतापर्यंत जवळपास ८७० पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यात आले आहे. यात ठाणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील पर्यटकांचा समावेश आहे.
विशेषतः कल्याण ग्रामीणमधील ७५ जणांचा एक गट काल मुंबईत परत आणण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यसंघाने तिथे थेट उपस्थित राहून पर्यटकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेची काळजी घेतली. त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनीही या कामात महत्त्वाची भूमिका बजावली. जाती-धर्म न पाहता प्रत्येक भारतीय पर्यटकाला सुरक्षित घरी पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला होता आणि त्या दिशेने सातत्याने काम केलं. शेवटचा पर्यटक घरी परत येईपर्यंत आमची टीम तिथे कार्यरत राहणार आहे. दरम्यान, दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत त्यांनी पाकिस्तानवरही टीका केली. तसेच काही राजकीय पक्षांनी या घटनेवरून चुकीचे राजकारण केल्याचा अप्रत्यक्ष टोला मोरे यांनी लगावला आहे. आम्ही कामातून उत्तर देतो, कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता लोकांच्या सेवेसाठी काम करतो, अशी प्रतिक्रिया आमदार राजेश मोरे यांनी दिली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली