विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अमरावतीतील सत्कार समारंभावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी देश शोकाकुल असताना सत्कार समारंभ आयोजित केल्याबद्दल राम शिंदे यांच्यावर टीका केली होती.
लोंढे म्हणाले होते, "पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिक मृत्युमुखी पडले असताना, देश अजूनही शोकमग्न असताना, राम शिंदे यांचा सत्कार करणे लाजिरवाणे आहे. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने जनाची आणि मनाची लाज बाळगायला हवी होती."
या टीकेला उत्तर देताना विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मिटकरी म्हणाले, "काँग्रेस पक्षात कुठेही समन्वय नाही. अतुल लोंढे यांना राम शिंदे यांच्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही."
ते पुढे म्हणाले, "पहलगाममधील हल्ला हा देशावर होता, त्यामुळे संपूर्ण देश शोकमग्न आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राम शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे अतुल लोंढे यांच्या पोटात दुखायचे काही कारण नाही.
"मिटकरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले, "काँग्रेसमध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव आहे. काँग्रेस स्वतःच स्वतःच्या अस्तित्वाला संपवण्याचे काम करत आहे."