स्थापना दिनालाच भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर
भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने 6 एप्रिल रोजी पक्षातील गटबाजी खुलेपणाने समोर आल्याचे बघायला मिळाले. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपमध्ये हे चित्र बघून ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका, अशा कानपिचक्या दिल्या. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन स्वतंत्र कार्यक्रमांचे आयोजन केले.
मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात, तर जोरगेवार यांनी कन्यका सभागृहात स्थापना दिनाचा कार्यक्रम घेतला. जोरगेवार यांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस आणि ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर उपस्थित होते.
एकाचवेळी एकच पक्षाचे एकच शहरात दोन कार्यक्रम झाल्याने कार्यकर्त्यांची गोची झाली. कोणत्या नेत्याकडे जावे, या संभ्रमात कार्यकर्ते सापडले.