बुलढाणा वनविभागात दोन बिबट्यांचे मृतदेह आढळले; विषप्रयोगाचा संशय, एक आरोपी ताब्यात
बुलढाणा परिक्षेत्रातील गुम्मी वर्तुळ, गुम्मी नियतक्षेत्रातील वनखंडामध्ये 9 एप्रिल रोजी दोन बिबट्यांचे मृतदेह आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याला विद्यमान प्रथम वर्ग न्यायालय, बुलढाणा येथे हजर केले असता एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी दिली.
बिबट्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले असून त्यांचा मृत्यू अंदाजे 10 ते 15 दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनानंतर बिबट्यांचे अवयव न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, बिबट्यांच्या मृत्यूमागे विषप्रयोगाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्रकरणाचा सखोल तपास सहाय्यक वनसंरक्षक बुलढाणा तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) बुलढाणा करत असून, वन्यजीव क्राईम सेल, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांच्याकडूनही तपासात मदत घेतली जात आहे. बिबट्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे पुढील न्यायवैद्यक अहवालावरून स्पष्ट होणार आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली