सांगली बाजार समितीचे त्रिभाजन
आमदार सुधीर दादा गाडगीळ ह्यांच्या मागणीला यश; सांगली, जत, कवठेमहांकाळ तीन स्वतंत्र बाजार समित्या
दि.१७ : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करावे आणि मिरजेसाठी सांगलीत स्वतंत्र बाजार समिती असावी ही मागणी शासनाने मान्य केली असून तसा अध्यादेशही काढण्यात आला आहे,अशी माहिती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.
ते म्हणाले, सहकार आणि पणन विभागाच्या अध्यादेशानुसार आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन झाले असून मिरजेसाठी सांगली तसेच जत आणि कवठेमहांकाळ अशा तीन बाजार समित्या स्वतंत्रपणे अस्तित्वात येणार आहेत. मिरज तालुक्यातील शेतकरी, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स तसेच सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डमधील कर्मचारी व व्यापारी यांची फार वर्षापासूनची प्रलंबित मागणी आता पूर्ण झाली आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त मिरज तालुक्यासाठी स्वतंत्र झाली आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्थापनेपासून जत, कवठेमहांकाळ येथील उपसमित्या तसेच ढालगाव येथील दुय्यम बाजार यांचा समावेश होता. ज्यावेळी या बाजार समितीची स्थापना झाली त्यावेळच्या परिस्थितीनुसार तो निर्णय घेण्यात आला होता. परंतु नंतरच्या काळात जत आणि कवठेमहांकाळ या ठिकाणी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करणे आवश्यक होते. या दोन्ही बाजार समित्या तसेच ढालगाव दुय्यम बाजार यांचा सांगली बाजार समितीच्या आर्थिक उत्पन्नावर तसेच कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत होता.
सांगली बाजार समितीचे उत्पन्न हे प्रामुख्याने मिरज तालुक्यातून तसेच सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्ड मधूनच मिळत होते परंतु या उत्पन्नापैकी ८० टक्के भाग हा जत , कवठेमहांकाळ आणि ढालगाव या ठिकाणी खर्च होत होता. त्यामुळे सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डमधील रस्ते ,ड्रेनेज अशा नागरी सुविधांसाठी सुद्धा बाजार समितीला खर्च करणे कठीण झाले होते. सांगली चेंबर ऑफ कॉमर्सने तसेच मिरज तालुक्यातील शेतकरी व व्यापारी यांनीही अनेकदा या त्रिभाजनाची मागणी केली होती परंतु राजकीय कारणामुळे ती मान्य झाली नव्हती. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी हा विषय सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पणदमंत्री जयकुमार रावल यांच्यासमोर मांडला. त्याचबरोबर विधिमंडळातही त्यांनी या त्रिभाजनाची मागणी केली होती. उत्पन्न सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे आणि त्यापैकी अधिक खर्च मात्र जत ,कवठेमहांकाळ आणि ढालगाव येथे हा मिरज तालुक्यावर अन्याय आहे असे आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले होते. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात आहे; फक्त सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ आणि मिरज यांचीच संयुक्त बाजार समिती आहे हेही आमदार गाडगीळ यांनी निदर्शनास आणले होते.
मुख्यमंत्र्यांनी पुढील शंभर दिवसांच्या कार्यक्रमात राज्यातील राज्यात नव्याने तालुकावार ६८ बाजार समित्याची निर्मिती करायचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार आता राज्यात नवीन ६८ बाजार समित्या स्थापन होणार आहेत. त्यामध्येच मिरजेसाठी स्वतंत्र सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जत आणि कवठेमहांकाळ या तालुक्यांसाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या बाजार समित्यांसाठी कर्मचारी नियुक्ती तसेच पायाभूत सुविधा या संदर्भातील प्रस्तावही तातडीने शासनाला सादर करायचे आदेश देण्यात आले आहेत.