उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था
काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून, दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. त्यामुळे रखरखत्या उन्हात उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क असून, जिल्हा सामान्य रुणालयात उष्माघाताच्या रुणांसाठी एका वॉर्डात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. शहरासोबतच तसेच ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा वाढल्याचे दिसून आले. फेब्रुवारी अखेरपासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाल्याने एप्रिल आणि मे महिन्यांत उन्हाचा तडाखा अधिक वाढण्याची शक्यता आहे. माणसाच्या शरीरामध्ये नॉर्मल तापमान हे ३७ अंश सेल्सिअस असते आणि शरीर थंड होण्याची प्रक्रिया सुरु होते.
शरीरातील पाणी संपले तर घाम येणे बंद होऊन तोंडाला कोरड पडून उष्माघाताची शक्यता अधिक असते. त्यामुळे उन्हामध्ये बाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुणालयात उष्माघाताच्या महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. उष्माघात होऊ नये यासाठी वाढत्या उन्हामध्ये कष्टाची कामे करणे टाळावी, उष्णता शोषून घेणारे कपडे घालावेत, उन्हामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करू नये, भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, घराबाहेर पडताना छत्री, टोपी किंवा चेहऱ्यावर कपडा बांधावा, अशक्तपणा असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे स्वतःची उन्हापासून सांभाळावे असे आवाहन वैद्यकिय अधिक्षक डॉ. निलेश टापरे यांनी केले आहे.