वरळीकरांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा; ठाकरे गट आक्रमक
वरळी परिसरातील नागरिकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अपुऱ्या व दूषित पाण्याचा सामना करत अखेर रस्त्यावर उतरावे लागले. शिवसेना (ठाकरे गट) तर्फे 'हंडा मोर्चा'चं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, मोर्चाच्या आधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवत मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला.
या वेळी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडलं आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, आमदार, महिला उपनेत्या व स्थानिक नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जी दक्षिण प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त मृदुल अंडे यांची भेट घेत निवेदन दिलं. या बैठकीत पाण्यासह इतर कामाचे मुद्दे उपस्थित केले.
वरळी परिसरातील नागरिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या आणि दूषित पाण्याच्या समस्येवरून आज शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली. मागील अनेक महिन्यांपासून तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर 'हंडा मोर्चा' काढण्याचा इशारा दिला होता. मात्र, मोर्चाच्या आधीच पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावत जमावबंदीचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार १५ ते २९ एप्रिलदरम्यान संपूर्ण शहरात जमावबंदी लागू असून कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचल्यास जबाबदारी आयोजकांची असेल, असा स्पष्ट इशारा नोटीसीत देण्यात आला. तरी देखील ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाले. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत मोठा गोंधळ घालत ठिय्या आंदोलनात केले. या वेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर, सचिन आहीर, आमदार सुनील शिंदे, स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली