गौणखनिज माफीयांमुळे रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचं खड्ड्यात बसून रास्ता रोको आंदोलन
धुळे शहरालगत असलेल्या चितोड - रावेर रस्त्यावर गौण खनिज माफीयांच्या अति अवजड वाहनांच्या वापरामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या भागात गौण खनिजमाफियांना आवर घालून तात्काळ रस्ता दुरुस्त करा या मागणी करिता चितोड गावातील ग्रामस्थांनी खड्ड्यातील पाण्यात बसून आंदोलन केले आहे. प्रशासनाच्या चाल ढकलपणाचा देखील आंदोलन कर्त्यांनी निषेध नोंदवला.
यावेळी रास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस स्टेशनचे परिविक्षादीन पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख आंदोलन स्थळी पोहोचत आंदोलनकर्त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी देखील करण्यात आली. त्यामुळे गौण खनिज माफीयांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
चितोड रावेर रस्ता तयार करण्यात यावा याकरिता ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा प्रशासनासह बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांनी 1 एप्रिल पासुन रस्ता तयार करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले होते. मात्र तरी देखील रस्त्याचा काम सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत चितोड गावात रास्ता रोको आंदोलन केला आहे. ग्रामस्थांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर रस्ते कामाला सुरुवात होईल का? हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.