यशोमंदीर सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत संस्थापक पॅनलचा एकतर्फी विजय; १७ ही जागांवर दणदणीत यश!
नेरुळ (नवी मुंबई) – यशोमंदीर सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत संस्थापक पॅनलने १७ पैकी सर्वच्या सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला आहे. हा विजय संस्थेच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. संस्थापक अध्यक्ष श्री एम.एस. गायकर यांच्या नेतृत्वाखाली, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व सभागृह नेते श्री रविंद्र इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मा. चेअरमन श्री बी.जी. गायकर, श्री भानुदास आरोटे व श्री अशोक वाळुंज यांच्या अथक परिश्रमामुळे हे यश शक्य झाले आहे.
तीन हजाराच्या मताधिक्याने सर्व उमेदवार विजयी:
या निवडणुकीमध्ये संस्थापक पॅनलच्या सर्व उमेदवारांनी सुमारे तीन हजार मताधिक्याने विजय मिळवला. मतमोजणीनंतर नेरुळमध्ये ढोल-ताशांच्या गजरात, महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. संपूर्ण परिसर ‘विजयी भव’च्या जयघोषांनी दुमदुमून गेला.
संघटन, नियोजन आणि कार्यक्षम प्रचाराचा विजय:
या विजयाचे श्रेय सांगताना श्री रविंद्र इथापे यांनी सांगितले, "संस्थापक पॅनलच्या उमेदवारांनी केलेले सामाजिक कार्य, नियोजनबद्ध प्रचार, उत्साही प्रचारसभा व धडाकेबाज रॅली यामुळे मतदारांचा विश्वास मिळवता आला. हे यश संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव व सभासदांच्या एकजुटीचे आहे. ही निवडणूक ही निव्वळ सत्ता मिळवण्याची नव्हे, तर सेवा करण्याची संधी आहे आणि नवनिर्वाचित कार्यकारिणी हे काम जबाबदारीने पार पाडेल, असा विश्वास मी देतो."
सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि भावनात्मक प्रतिक्रिया:
श्री बी.जी. गायकर यांनी आपल्या भाषणात सर्व मतदार, कार्यकर्ते व सभासदांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, "हा विजय म्हणजे विश्वासाचा विजय आहे. आम्ही याला पात्र ठरण्याचा प्रत्येक क्षणी प्रयत्न करू."
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली