मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्याने दर घसरले
नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याचे दर घसरलेले आहेत, तर आवक वाढलेली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १५ टक्क्यांनी कांद्याचे दर कमी झाले आहेत. तर १८ ते २० रुपयांनी मिळणारे कांदे आता १३ ते १४ रुपये किलोने विकले जात आहेत.
तसेच एपीएमसी बाजारात शंभर गाड्यांची आवक आहे. दरम्यान, केंद्र सरकारने एक्सपोर्ट ड्युटीच्या निर्णयात बदल केल्याने याचा परिणाम व्यापाऱ्यांवर झाला आहे.
केंद्र सरकारने थेट माल विक्री करण्याची परवानगी दिल्याने, शेतकरी स्वतःच माल विक्री करतात. त्यामुळे दर घसरले असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
त्याचसोबत कांद्याचे दर कमी झाले असले तरी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने कांद्याचा माल बाजार समितीमध्ये तसाच पडून आहे. पुढील काही दिवस दर कमी जास्त होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.