धुळे मनपात आयएएस दर्जाचा आयुक्त नेमा; माजी आ. अनिल गोटे यांची मागणी
धुळे महापालिकेत आयएएस दर्जाचा आयुक्त प्रशासक म्हणून नेमावा, अशी मागणी धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. त्यांनी सध्याच्या आयुक्ता विरूध्द गंभीर तक्रारी देखील केल्या आहेत. त्यांनी केलेल्या तक्रारीची नाशिक विभागीय महसुल आयुक्त प्रविण गेडाम यांनी गांर्भीयाने दखल घेतली आहे.
महसुल आयुक्त प्रविण गेडाम यांनी नगरविकास सचिवांना पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे की, माजी आ. गोटे यांच्याकडील दि. 18 फेब्रुवारी रोजीचे पत्र या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. माजी आ. गोटेंच्या पत्रानुसार, मागील सहा वर्षात धुळे महानगरपालिकेत राज्य शासनाच्या दृष्टीने आर्थिक शिस्तीला, धोरणात्मक निर्णयाला फाटा देऊन धुळे महानगरपालिकेत राज्य शासनाच्या तिजोरीतून आलेल्या रकमेपैकी किमान 50 टक्के रक्कम म्हणजेच 500 ते 550 कोटी रुपये भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात गेले आहेत असे सदर पत्रात नमुद केलेले आहे.
तसेच धुळे महानगरपालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी सर्व कायदे, नियम, अधिकार यांचे सर्रास उल्लंघन करुन, नव्हे तर पायदळी तुडवून, हुकूमशाही पध्दतीने कारभार हाकला आहे. त्यामुळे तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे महसुल आयुक्त गेडाम यांनी म्हटल्याचे माजी आ. गोटे यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले.