कल्याणमध्ये गावठी पिस्तुल घेऊन फिरणारा 'बिंदास म्हात्रे' गजाआड; शस्त्रसाठा पोलिसांनी केला जप्त
कल्याण गुन्हे शाखा, घटक ३ युनिट मधील कार्यरत पोलीस शिपाई मिथुन राठोड यांना कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेतीवली चक्कीनाका परिसरात राहणारा एक इसम विनापरवाना गावठी पिस्तुल आणि काडतुसे बाळगत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बिंदास अनंता म्हात्रे (वय ३६) याला कल्याण कोळसेवाडी परिसरातून ताब्यात घेत त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या कडून एक देशी पिस्तुल, मॅगझिन, दोन जिवंत काडतूस आणि एक काडतुसाची पुंगळी असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.
बिंदास म्हात्रेवर भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ अन्वये कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत हे पिस्तूल कुठून आणले व कशासाठी आणले? याचा तपास सुरू आहे.