घोटगे-सोनवडे-गारगोटी-कोल्हापूर नियोजित घाटमार्गाच्या कामाला चालना मिळणार, जानेवारीत झाली संयुक्त पाहणी
जवळपास ४० ते ४५ वर्षांच्या अथक लढ्यानंतर दृष्टिपथात आलेल्या सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील घोटगे-सोनवडे-गारगोटी-कोल्हापूर या नियोजित घाटमार्गाच्या कामाला चालना मिळणार आहे. या घाटमार्गाच्या नव्या आराखड्याला केंद्रीय पर्यावरण सल्लागार समिती, केंद्रीय वन्यजीव संरक्षण समिती आणि व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या तीन समित्यांच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. जानेवारी महिन्यात या तिघांकडूनही संयुक्तपणे नव्या आराखड्याची पाहणी करण्यात आली होती.
यावेळी वन्यजीव संरक्षण विभागाने काही बदल सुचवले होते. त्यानुसार, नवा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.
घोटगे सोनवडे-पाटगाव-गारगोटीमार्गे कोल्हापूर असा हा नियोजित घाटमार्ग आहे. या नियोजित घाटमार्गाचा पूर्वीचा आराखडा बदलून नवीन आराखडा निश्चित करण्यात आला. या नव्या आराखड्यानुसार, या घाटमार्गाची लांबी तीन ते साडेतीन किमीने वाढली असून १३.३४ किमी एकूण लांबीपैकी तीन किमीचा मार्ग कोल्हापूर हद्दीत तर १० किमीचा मार्ग सिंधुदुर्ग हद्दीत आहे. या नव्या आराखड्याला सार्वजनिक बांधकामच्या मुख्य अभियंत्यांनी मान्यता दिल्यानंतर केंद्रीय पर्यावरण सल्लागार समिती, केंद्रीय वन्यजीव संरक्षण समिती आणि केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांची मान्यता आवश्यक आहे.
या समित्यांनी संयुक्त पाहणी केल्यानंतर आता नव्या आराखड्याला त्यांच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. त्यानंतर राज्यस्तरावरील वनविभागाच्या आवश्यक परवानगी घेवून या कामाला चालना दिली जाणार आहे.
नव्या आराखड्यानुसार, या घाटमार्गातून अवजड वाहतूक सहजपणे होणार असून, चढ आणि वळणे कमी करण्यात आली आहेत. जेणेकरुन हा घाटमार्ग वाहतूकीसाठी अधिक सुरक्षित आणि कोल्हापूर-सिंधुदुर्ग अंतर कमी करणारा ठरणार आहे. राज्यसरकारकडून आवश्यक ती कार्यवाही झाल्यानंतर टेंडर निश्चिती होणार आहे. अर्थात प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी पावसाळ्यानंतरचा हंगाम येणार आहे.