LOKSANDESH NEWS
गोविंदवाडी बायपास परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, शिवसेना शिंदे गटाकडून आमरण उपोषण
कल्याण गोविंदवाडी परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलं आहे. चालायला रस्ते नाही, जागोजागी गटाराचे पाणी रस्त्यावर आले आहे,
नियमितपणे कचरा उचलला जात नाही, पाणी समस्या आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी शिफा पावले यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेकडे अनेकदा पत्रव्यवहार केला, आंदोलने केली.
मात्र, त्यानंतर देखील केडीएमसी प्रशासन या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पावले यांनी केला आहे. या भागात चार ते पाच शाळा असून, या अस्वच्छतेमुळे आता विद्यार्थ्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.
अनेकदा पत्रव्यवहार आंदोलनं करून देखील केडीएमसी प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याने आजपासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालय शेजारी आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे शिफा पावले यांनी सांगितले.