संगमनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार : डॉ. अमोल कर्पे यांच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल, नागरिकांचा संताप!
संगमनेर : संगमनेर शहरातील सुप्रसिद्ध डॉ. अमोल संताजी कर्पे यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
सदर मुलगी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिने आपल्या मैत्रिणीला सांगितले, आणि वर्गशिक्षकांच्या सल्ल्यानुसार ती डॉ. कर्पे यांच्या दवाखान्यात ऍडमिट झाली. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी मुलीला टेरेसवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, डॉक्टर कर्पे यांनी तिचा विनयभंग करताना जिवे मारण्याची धमकीही दिली.
या गंभीर प्रकरणी नाशिक येथून डॉक्टर कर्पे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पटेल करत आहेत.
घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण राजू सातपुते, वेणूगोपाल लाहोटी, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर गायकर, संकेत एखंडे, राष्ट्रवादीचे आसिफ तांबोळी तसेच शिवसेनेचे माजी अध्यक्ष अमोल कतारी यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीने पोलिसांना निवेदन दिले. त्यांनी डॉ. कर्पे यांना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी केली आहे.
हॉस्पिटलच्या बाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती, मात्र पोलिसांनी तातडीने बंदोबस्त लावून कोणताही अनुचित प्रकार होऊ दिला नाही.
“या अमानुष कृत्यामुळे संगमनेरच्या आरोग्य क्षेत्राला काळिमा फासला गेला असून, अशा नराधमाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी प्रतिक्रिया अनेक स्थानिकांनी दिली आहे.