LOKSANDESH NEWS
खाणीत सोने सापडल्याचे सांगून १५ लाखांत दिले पितळेचे दागिने, आरोपी दाम्पत्याला पुण्यातून अटक
खाणीत सोने सापडले, सराफाकडे विक्री करता येत नाही. त्यामुळे कमी पैशात दागिने विकत असल्याची बतावणी करून एका महिलेची पंधरा लाखांनी फसवणूक करण्यात आली. आरोपींनी सोन्याचे असल्याचे भासवत प्रत्यक्षात पितळेचे दागिने दिले. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी तांत्रिक तपास करून आरोपी दाम्पत्याला पुणे येथून अटक केली. गणेश काशी त्याची पत्नी शांती काशी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून ७ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
फिर्यादी सरला अग्रवाल यांचे इतवारी परिसरात रजाई भंडार या नावाने दुकान आहे. आरोपी दाम्पत्य त्यांच्या दुकानात गेले. त्यांच्याकडून बेडशीट खरेदी केली. घरी गेल्यानंतर बेटशीट परत करण्याच्या बहाण्याने पुन्हा दुकानात गेले. त्यांच्याशी ओळख करून घेतली. खाणीत सोने सापडले, सराफाकडे विक्री करायला गेलो तर पावती मागतील आणि पावती आमच्याकडे नाही. अलीकडेच मुलीचे लग्न आहे.
आम्हाला पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे कमी पैशांत दागिने विकत आहे, अशी बतावणी केले. अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला. आधी विश्वास बसावा म्हणून आरोपीने फिर्यादी यांना चार सोन्याचे मनी दिले. त्यांनी सराफा व्यापाऱ्याकडून तपासणी केली असता ते सोन्याचे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे फिर्यादी सरला अग्रवाल यांचा आरोपींवर विश्वास बसला. नंतर त्यांनी १५ लाखांत सौदा पक्का केला. दागिने घेतले. नंतर अग्रवाल सराफा दुकानात तपासणी करायला गेल्या असता ते दागिने पितळेचे असल्याचे उघड झाले. त्यांनी लगेच नंदनवन पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक केली.