बीड जिल्ह्यात जायकवाडीतील पाण्यासाठी 140 गावातील शेतकरी आक्रमक
बीड जिल्ह्यातील 140 गावातील शेतकऱ्यांचे जायकवाडीचे पाणी शेतीला मिळावे, यासाठी गेवराई तालुक्यातील तांदळा येथे गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने महायुतीच्या जाहिरनाम्याची होळी करण्यात आली. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विमानतळ नको, पाणी द्या, असा टाहो फोडला.
गेल्या चार दिवसापासून अजय पाटील साळुंके हे उपोषण करत असून, त्यांची प्रकृती खालावली आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ एकत्रित आले आहेत. जायकवाडी किंवा कृष्णा खोऱ्यातील पाणी शेतीला मिळावे. यासाठी वर्षभरापासून 140 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत लोकलढा आंदोलन सुरू केले आहे. यासह शेतकरी कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प या मागण्याही शेतकर्यांच्या आहेत.
याकडे लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासन लक्ष देत नसल्याने 140 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आज तांदळा येथे महायुती सरकारच्या जाहिरनाम्याची होळी केली. या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.