धुळे शहरात 15 कोटी रुपयांचे आयुष हॉस्पिटल उभारणार; खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी केली जागेची पाहणी
धुळे शहरात 15 कोटी रुपयांचे 50 खाटांचे आयुष हॉस्पिटल उभारण्यात येणार असून, यास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांनी मंजुरी दिली आहे. खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या मागणीनंतर ही योजना राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत धुळे शहरात मंजूर करण्यात आली आहे.
राज्य वार्षिक कृती आराखड्यात सन 2025-26 साठी किमान 10 आयुष हॉस्पिटल्स उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यात धुळे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बच्छाव यांनी संसद भवनात पाठपुरावा केला होता. या निर्णयानुसार धुळे शहरातील गणपती मंदिराजवळील 32 क्वार्टर्स परिसरातील जागेची पाहणी खासदार बच्छाव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सयाजी भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
खासदार डॉ शोभा बच्छाव यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की "धुळे जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी यांसारख्या पारंपरिक उपचारपद्धती सहज उपलब्ध होतील. या प्रकल्पामुळे गुणवत्तापूर्ण आयुष सेवा सामान्य जनतेपर्यंत पोहोचणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली