गोंदिया व तिरोडा नगर परिषदेसाठी शिवसेना स्वबळावर निवडणूकीच्या रिंगणात उतरणार
गोंदिया व तिरोडा नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) जिल्हाप्रमुखांनी जाहीर केलं आहे की, गोंदिया आणि तिरोडा नगर परिषद निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. सध्या सर्व प्रभागांमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत असून, मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर दिला जात आहे.
संघटन मजबूत करण्यावर तसेच स्थानिक प्रश्नांवर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाप्रमुखांनी स्पष्ट केलं की, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल. मात्र, गोंदिया आणि तिरोडा येथील कार्यकर्त्यांची भावना आहे की या निवडणुकीत शिवसेनेनं स्वबळावर उतरणं गरजेचं आहे. नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर गोंदियात राजकीय वातावरण तापू लागलं असून, शिवसेनेच्या हालचालींवर सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे.