मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा हस्ते लोकार्पण
महाराष्ट्र शासन माननीय मुख्यमंत्री सचिवालय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधीच्या अंतर्गत अनेक रुग्णांना उपचारासाठी मदत करण्यात येत असते. त्याच अनुषंगाने धुळे जिल्ह्यात देखील कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना मदत होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री तथा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
या कक्षाच्या नियमित व दैनंदिन कामकाजासाठी राज्य शासनाच्यावतीने वैद्यकीय अधिकारी तथा कक्ष अध्यक्ष डॉ. योगेश पाटील, लघुलेखक तथा सदस्य प्रमोद बागुल, सामाजिक वैद्यकीय अधिक्षक तथा सदस्य कपिल पिवाल यांची नियुक्ती केली आहे. तरी धुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांनी वैद्यकीय आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे.