लग्नात अडचण ठरल्याने ३५ वर्षीय गर्भवती प्रेयसीवर प्रियकराचा प्राणघातक हल्ला
चार वर्षे 'लिव्ह इन' मध्ये राहणाऱ्या गर्भवती प्रेयसीवर प्रियकराने चाकूने प्राणघातक हल्ला चढविला. मार्डी रोडवरील बोडना तपोवनेश्वर गावाजवळ रविवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी तिच्या प्रियकरासह त्याच्या मित्राला अटक केली. ती आपल्या १२ मे रोजी असणाऱ्या लग्नात अडचण निर्माण करीत असल्याने आपण तिच्यावर चाकूने वार केल्याची कबुली त्याने दिली आहे. चौकशीदरम्यान आरोपी राहूल हा तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांची तपासाची दिशा निश्चित झाली. विशेष म्हणजे रविवारी त्याची हळद होती.
पूजा (३५) असे प्रियकराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अविवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी राहूल (२६, समाधाननगर) व त्याचा मित्र पियुष (३६, राजापेठ) याला तातडीने अटक केली. पूजाला पोलिसांनी अत्यवस्थ स्थितीत इर्विनमध्ये दाखल केले. राहुलने तिच्या पाठीवर, पोटावर व मानेलगत चाकुने वार केले. तत्पूर्वी, आपणास जेवण करायला जायचे आहे, म्हणून राहुल पुजाला घेऊन मार्डी रोडने गेला. त्याने मित्र पियुषलाही बोलावले. तपोवनेश्वर गावालगत त्यांचा वाद झाला. मी गर्भवती असताना तू लग्न कसे करू शकतोस, असा सवाल तिने केला.
त्यावर राहुलने तिच्यावर चाकुने अनेक वार केले. पहिल्या पतीपासून विभक्त राहत होती. एक महिला रक्तबंबाळ स्थितीत पडून असल्याची माहिती डायल ११२ वर देण्यात आली. गुन्हे शाखेचे गोरखनाथ जाधव व ठाणेदार निलेश करे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. आपणास पतीने मारले, असे सांगताच गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रमुख बाबाराव अवचार यांनी बडनेरा गाठले. तेथे तिच्या पतीचा शोध घेतला. आपला तिच्याशी काहीही संबंध नसल्याचे त्याने सांगितले. ती चार वर्षापासून पतीपासून विभक्त राहत असल्याचे समोर येताच उकल झाली.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.