भिवंडीतील समस्यांवर माजी आमदार रशीद ताहिर मोमिन यांनी घेतली पालिका प्रशासनाची भेट
- भिवंडी शहरातील विविध समस्या लक्षात घेऊन काँग्रेस शहराध्यक्ष व माजी आमदार रशीद ताहिर मोमिन यांनी पालिका प्रशासनाशी विशेष बैठक घेतली. या बैठकीत शहरातील रस्त्यांची खराब अवस्था, साफसफाईची खराब व्यवस्था, नाल्यांची वेळेवर सफाई न होणे आणि वाढत्या नशेच्या व्यसनाधीनतेसारख्या गंभीर मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
रशीद मोमिन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शहरातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांना रोजच्याच प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी तात्काळ रोड वेडिंग व दुरुस्ती करण्यात यावी. तसेच पावसाळा जवळ आल्याने नाल्यांची स्वच्छता वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे, अन्यथा शहरात पाणी साचण्याचा धोका निर्माण होईल. नशेच्या वाढत्या विळख्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. तरुण पिढी हळूहळू नशेच्या आहारी जात असल्याने पोलीस प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. शेवटी, रशीद मोमिन यांनी इशारा दिला की, प्रशासनाने जर वेळेत ठोस पावले उचलली नाहीत, तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल आणि जनआंदोलन छेडेल, असे रशीद ताहीर म्हणाले.