LOKSANDESH NEWS
चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिक नदीत अडकले, नदी पात्रात अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाला यश
चिपळूण तालुक्याला मान्सूनने झोडपून काढले आहे. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक नागरिक या नदीच्या पाण्यामध्ये अडकून होते. परंतु, आपत्कालीन व्यवस्थापनाच्या रेस्क्यू टीमने यांना सुखरूपपणे रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू होती. अशातच चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील नदीपात्रात अडकलेल्या तिघांना रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला यश आलं आहे.
संतोष पवार, त्यांची पत्नी सुरेखा पवार आणि पुतण्या ओंकार पवार अशी बचावलेल्या तिघांची नावं आहेत. हे तिघेही दळवटणे येथील आहेत. हे तिघेही नदीमध्ये चढणीचे मासे पकडण्यासाठी गेले होते. मात्र, मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्यात वाढ झाली. त्यामुळे ते नदीपात्रातील एका बेटावर अडकले. या सगळ्या घटनेची तातडीने दखल घेत चिपळूण तालुका प्रशासनाचे प्रमुख प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका प्रशासन रेस्क्यू टीमने बचावकार्य सुरु केले. रात्री उशिरापर्यंत चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अडकलेल्या तीन नागरिकांना बाहेर काढण्यात आले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.