LOKSANDESH NEWS
सोलापुरातून चिमुरडीला पळवले,पैंजण काढून मोडनिंबमध्ये सोडले
मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बसस्थानकावर आलेल्या चिमुरडीला अनोळखी महिलेने पळवले.तिच्या कानातील सोन्याच्या रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत तिला मोडनिंब येथे एका लग्न समारंभात सोडल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर वन्हाडींनी सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल केली.सहा तासात तिचे आई-वडील मोडनिंबमधील लग्न समारंभात पोलिसांसह दाखल झाले. मुलीला सुरक्षित पाहून त्यांचे डोळे पाणावले.
बावी येथील राजाभाऊ माळी यांच्या मुलीचे लग्नकार्य मोडनिंब येथील एका मंगल कार्यालयामध्ये सुरू होते. अक्षताच्या वेळी चिमुरडी वन्हाडींना रडताना दिसली.तिची विचारपूस केली असता ती फक्त मी सोलापूरची आहे, एवढेच सांगत होती.या अडीच वर्षाच्या चिमुकलीबाबत राजाभाऊ माळी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली.
दरम्यान संशयित महिलेने चिमुरडीला मोडनिंब येथे माळी यांच्या लग्नकार्यात सोडून दिले.तेव्हा तिच्या कानातील सोन्याची रिंग आणि पैंजण पायात नव्हते. दरम्यान,पोलिसांनी तत्काळ बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक महिला मुलीला घेऊन जाताना दिसून आली.आणि पोलिसांनी वेळ न दवडता मुलीला शोधून काढले.अद्याप मुलीला पळवून नेणारी महिला फरार असून पोलीस शोध घेत आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली