३ दिवसांत २.४७ कोटींची रोकड जप्त, मलकापूर शहर व ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

३ दिवसांत २.४७ कोटींची रोकड जप्त, मलकापूर शहर व ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई

                                                            LOKSANDESH  NEWS 



             ३ दिवसांत २.४७ कोटींची रोकड जप्त, मलकापूर शहर व ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई



बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील बोदवड नाक्यावरील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ २३ मे रोजी मलकापूर शहर पोलिसांनी एका कारची तपासणी करत १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त केली. तर, यापूर्वी २० मे रोजी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील धानोरा (विटाळी) पुलाजवळ खामगावहून मलकापूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून ५० लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. तीन दिवसांत एकूण २ कोटी ४७ लाख ५० हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.

मलकापूर शहर पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून २३ मे रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास बोदवड रस्त्यावर कारची तपासणी केली. मलकापूर ते बुलढाणा रोडवर सिल्व्हर रंगाच्या कारची (एमएच एमएच २० जीव्ही १७८१) तपासणी केली. कारमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील दोन व्यक्ती होते. त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने गाडीची तपासणी केली असता गाडीतील सीटच्या खाली मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसून आले. त्यांना रोख रकमेबाबत विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तर न दिल्याने ही गाडी मलकापूर शहर पोलिस ठाणे येथे आणण्यात आली. त्यानंतर तहसीलदार व नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मलकापूर, महसूल विभाग मलकापूरचे २ शासकीय पंच आणि भारतीय स्टेट बँकच्या कॅश मोजण्याच्या मशीनसह २ अधिकारी यांचे समक्ष गाडीतील कॅश व्हिडिओ शूटिंगमध्ये मोजण्यात आली. या गाडीत तब्बल १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपये मिळून आले. याबाबत आयकर विभाग नागपूर यांना माहिती देऊन जप्त रक्कम जिल्हा कोषागार कार्यालय बुलढाणा येथे जमा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

३ दिवसांपूर्वी ५० लाख रक्कम मलकापूर पोलिसांनी रात्रगस्तीवर असताना एका पांढऱ्या रंगाच्या कार (एमएच २१ बीवाय १०१) गाडीला थांबवून तपासणी केली असता, गाडीत ५० लाख रुपयांची रोकड आढळली होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप काळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत राठोड, एएसआय उल्हास मुके, रविकांत बावस्कर, दीपक नाफडे, संदीप राखोंडे व कन्हाडे यांचे पथकाने केली. सदर प्रकरण आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./