बनेश्वर परिसरात प्रथमच अती दुर्मिळ ‘बेडडोम मांजऱ्या साप’ आढळला
काल संध्याकाळी साडेसात वाजता पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे कार्याध्यक्ष विशाल शिंदे यांना करण जाधव यांच्याकडून एक महत्त्वाचा कॉल आला. बनेश्वर परिसरात एका घराजवळ गाडीच्या कॅपमध्ये एक साप आढळून आल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सर्पमित्र विलास धोंगडे, संतोष पाटील आणि श्रीकांत खेडकर यांना घटनास्थळी पाठवले.
सर्वांनी घटनास्थळी पोहोचून काळजीपूर्वक पाहणी केली असता, एक अति दुर्मिळ प्रजातीचा साप – ‘बेडडोम मांजऱ्या साप’ (Boiga beddomei) आढळून आला. झाडांवर राहणारा, सौम्य विषारी, आणि रात्री सक्रिय असलेला हा साप सह्याद्रीच्या घनदाट जंगलातच क्वचित आढळतो. त्याचे डोळे मांजरासारखे मोठे असतात, म्हणून त्याला 'Cat Snake' हे नाव मिळाले आहे. सुमारे १ मीटर लांबीचा, फिकट पट्टे असलेला हा साप अत्यंत लाजाळू आणि मानवापासून दूर राहणारा असतो.
सर्पमित्र विलास धोंगडे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने सापाला सुरक्षितपणे पकडले आणि नसरापूर येथील बनेश्वर वनउद्यानाच्या मागील बाजूस त्याचे नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन केले. विशेष म्हणजे, ही भोर तालुक्यातील अशी पहिली नोंद आहे जिथे हा अति दुर्मिळ साप आढळला आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना सर्पमित्र विलास धोंगडे म्हणाले, “आपल्या परिसरात अतिशय दुर्मिळ वन्यजीव आहेत. मात्र, अलीकडे डोंगराळ भागात फार्महाऊस, रो-हाऊस, हॉटेल्स आणि इतर बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक झाडांची कत्तल होऊन पर्यावरणाचे संतुलन ढासळत आहे. उन्हाळ्यात वाढलेले तापमान याचेच द्योतक आहे.” त्यांनी सरकारकडे आणि वन विभागाकडे विनंती केली आहे की डोंगराळ भागात कोणतेही बांधकाम, उत्खनन यावर त्वरित बंदी आणावी, जेणेकरून जैवविविधता टिकून राहील आणि भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्गाचे रक्षण होईल.